। मंडणगड । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील तीन नादुरुस्त धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला. चिंचाळी, पंदेरी या दोन गावापाठोपाठ आता भोळवली येथील पाणीसाठा कमी करण्यात आल्याने त्यावर अवलंबून असणार्या दुबार पिकांना पाणी उपलब्ध नसल्याने पिके सुकत असल्याची तक्रार शेतकर्यांमधून केली जात आहे. तीन धरणे कोरडी झाल्याने 14 गावांतील विहिरी, पाणवठे, विंधनविहिरी यांचा पाणीसाठाही जानेवारी महिन्यातच कमी झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यातच शेतीसाठी व अन्य कामासाठी पाणी उपलब्ध नसल्याच्या नागरिक व शेतकर्यांच्या तक्रारी येत आहेत.
यंदा धरणांची कामे सुरू असल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत डिसेंबर महिन्यात टंचाई बैठक होणे गरजेचे होते. किमान धरणव्याप्त गावांचा वेगळा विचार होणे गरजेचे होते; मात्र धरणव्याप्त गावामध्ये पाण्याचा तुटवडा भासणार आहे, ही बाब प्रशासनाला अवगत असतानाही प्रशासन समस्या निर्माण होण्याची वाट पाहात बसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यंदाच्या हंगामात पारंपरिक टंचाईग्रस्त गावांबरोबरच नवीन गावांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होणार असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण आहे. याची पूर्वकल्पना असताना प्रशासन हातावर हात धरून बसले आहे. ही बाब प्रकर्षाने जाणवत असतानाच यंदा टँकरग्रस्त गावांची यादी वाढण्याचे संकेत मिळत आहे. चिंचाळी व भोळवली धरणाच्या पाण्याचा लाभ झाल्याने गेली काही वर्षे अनेक स्थानिक शेतकरी कलिगंडाच्या शेतीकडे वळले होते. यंदा नाममात्र शेतकरी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करत आहेत. कलिंगड उत्पादक शेतकर्यांमध्ये कमालीची घट झाली आहे, ही बाब लपलेली नाही. धरणाच्या पाण्यावर विसंबून राहत पालेभाज्या करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले असून, टँकरने व डोक्यावरून पाणी आणून शेती वाचवावी लागते आहे.