। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान करत एका मुस्लीम कुटुंबाने जातीय सलोख्याचे उदाहरण दिले आहे. धर्माच्या भिंती ओलांडत बिहारमधील कुटुंबाने तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली आहे. हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात हे मंदिर उभारले जात आहे.
पाटणामधील महावीर मंदिर विश्वस्त मंडळाने या मंदिराचे काम हाती घेतले आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केली असून ते उद्योजक आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाची जमीन दान करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता त्यांनी पूर्ण केली आहे, अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी कुणाल यांनी दिली आहे. आचार्य यांनी खान यांनी दिलेलं हे दान दोन समाजात असणारा सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटले आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हे स्वप्न पूर्ण होणं अशक्य होते असे ते म्हणाले.
महावीर मंदिराने आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी 125 एकर जमीन मिळवली आहे. आता अजून 25 एकर जमीन विश्वस्त मंडळ मिळवणार आहे. विराट रामायण मंदिर 215 फूट उंच असलेल्या कंबोडियातील 12 व्या शतकातील जगप्रसिद्ध संकुलापेक्षा उंच असेल. पूर्व चंपारणमधील संकुलात 18 मंदिरे असतील आणि तेथील शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. या मंदिराच्या बांधकामाचा अंदाजे खर्च 500 कोटी आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामात सहभागी तज्ज्ञांसोबत विश्वस्त मंडळ सल्लामसलत करणार आहे.