। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिवाळी सणाचे औचित्य साधत आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे तेजोमय हे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे अलिबागमधील महिला उद्योगिनीना व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील यांनी शनिवारी (दि.15) अलिबाग येथे केले.
आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे सुरु करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रिया पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, नगरसेविका चित्रलेखा पाटील, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून आम्ही अलिबागच्या उद्योगिनीच्या आयोजिकांना धन्यवाद दिले. अशाप्रकारे प्रदर्शन आयोजित करुन अलिबागमधील महिला उद्योगिनींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह असाच आहे. महिलांनीही आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुटुंबालाही हातभार लागून आपली उन्नती साधण्यात त्यात यशस्वी होऊ शकतात. अलिबागमध्ये अशा प्रदर्शनामुळे एक चांगले व्यासपीठ महिलांना उपलब्ध करुन देण्यात आम्ही अलिबागच्या उद्योगिनी यशस्वी झाल्या आहेत. तसेच दरवर्षी असाच उपक्रम सुरु ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर असताना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे मी टाळते. पण महिलांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवडते. शिवाय त्या प्रदर्शनामध्ये खरेदीही करुन खारीचा वाटा उचलण्यात आनंद वाटतो, असे सुप्रिया पाटील यांनी सांगितले.
माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे यांनीही आम्ही अलिबागच्या उद्योगिनीच्या प्रदर्शनामुळे अलिबागमधील छोट्या उद्योजिका महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याचा फायदा त्यांना निश्चितच व्यवसाय वाढीसाठी होणार आहे.
चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, आम्ही अलिबागच्या उद्योगिनीच्या महिलांनी आपला व्यवसाय भविष्यात आणखी वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. यासाठी पीएनपीच्या माध्यमातून डिजिटल मिडियाचा कोर्स माफक फी अथवा मोफत देण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरुन त्यांच्या उत्पादनाला डिजिटल मिडियाच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. आज जगात डिजिटल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री सुरु असते. दिवंसेदिवस अलिबागचे स्वरुप बदलत चालले आहे. त्यामुळे आगामी काळात येथे येणार्या पर्यटकांना अलिबागमध्ये कोणती वस्तु मिळते हे डिजिटल मिडियाच्या माध्यमातून समजणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याश्विाय मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनीही आम्ही अलिबागच्या उद्योगिनीच्या उपक्रमाचे कौतूक करताना महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केले. यावेळी आशा बोराडे, अनुजा वर्तक, कविता पाटील, पूजा काठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
दरम्यान, रविवारी 16 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता पूजा थाळी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात ड्रेस मटेरिअल, साड्या,ज्वेलरी,कॉस्मेटिक्स गृहोपयोगी वस्तू,दिवाळी सणासाठी लागणार्या विविध वस्तुंचे स्टॉल्स सुरु करण्यात आले आहेत. त्यांना महिलांचा प्रतिसाद मिळत आहे.
आम्ही अलिबागच्या उद्योगिनीच्या प्रदर्शनाने महिलांना प्रोत्साहन; सुप्रिया पाटील यांचे प्रतिपादन
