सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बांधकाम केल्याची शासनाची कबुली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकी जागेत बागदांडा येथे अतिक्रमण करीत मिळकतखारचे सरपंच कडवे व उपसरपंच अभिजीत कडवे यांनी अनधिकृतपणे बांधकाम केले होते. त्यावेळी अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्काशित करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार अलिबाग-मुरूड विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनय विनायक कडवे यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. या तक्रारीला सहा महिने उलटून गेले, मात्र अद्यापही अनधिकृत बांधकाम करणार्यांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे अधिकारी कडवेंसोबत अर्थपूर्ण संबंध जोपासत असल्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या तक्रारीनंतर केलेल्या पंचनाम्यात अनधिकृत बांधकाम हे अभिजीत अमित कडवे व गोरखनाथ दशरथ कडवे यांनी केले असल्याचा स्पष्ट उल्लेख दि. 6 जून 2024 च्या पंचनाम्यामध्ये आहे. बांधकाम करताना कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती, हेदेखील शासनाने मान्य केले आहे.
शासकीय मिळकतीत नियमांचे उल्लंघन करुन अनधिकृत बांधकाम केल्याबाबत सरकारी यंत्रणेने संबंधित जागेचा सरकारी पंचनामा मंडळ अधिकारी सारळ व तलाठी मिळकतखार यांच्यासमक्ष केला होता. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले असल्याने कार्यकारी अभियंता यांनी बांधकाम करणार्या अभिजीत कडवे व गोरखनाथ कडवे यांच्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, आजमितीस त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
याउलट, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही.जी. तेलंग यांनी बांधकाम विभागाच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना दिसून आल्याचे कबूल करीत यापुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळविले आहे. वास्तविक पाहता, अतिक्रमण करणारे अभिजीत कडवे हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व गोरखनाथ कडवे हे ग्रामपंचायत सदस्य असून, त्यांच्या पत्नी या सरपंच आहेत. बांधकाम विभाग अनधिकृत बांधकाम करणार्यांना पाठीशी घालत असल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय येत्या आठ दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत भविष्यात अतिक्रमण होणार नाही, याबाबत मिळकतखार ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामसेवक यांना पत्र दिले आहे. त्याची प्रत मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तसेच अर्जदार विनय कडवे यांना देण्यात आली आहे. भविष्यात या जागेची मोजणी करून त्या जागेस संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील.
व्ही.व्ही. तेलंग, उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग