| नवीन पनवेल । वार्ताहर ।
सार्वजनिक गणेशोत्सवावर दोन वर्षे कोरोनाचे संकट होते, यंदा निर्बंधमुक्त सण साजरा होणार असल्याने आवाजाच्या मर्यादेसह सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कळंबोली पोलिस ठाण्याकडून सार्वजनिक गणेशोत्सव पदाधिकारी व नागरिकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करत उत्सव साजरा करावा. तसेच पारंपरिक वाद्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पनवेल परिमंडळ 2 सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनवणेदेखील उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी चर्चा करण्यात आली; तर खारघर येथेही तळोजा, नावडे वसाहत आणि परिसरातील गावातील गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी गणेश मंडळांनी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील, असे आक्षेपार्ह देखावे करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, उत्सवासाठी लागणार्या सर्व परवानगी घेऊनच कार्यक्रमाचे आयोजन करावे, मंडळाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे व स्वयंसेवक नेमावेत, सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूक विहित वेळेत सुरू व विहित वेळेत संपवावेत, अशा सूचना मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे उत्सवात बेवारस वस्तू व व्यक्तीच्या संशयित हालचाली निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
जितेंद्र सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर