| पनवेल । वार्ताहर ।
नावडे परिसरामध्ये ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना तळोजा पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. जरमन जित लखबिर सिंग (वय 30) व रिम्पल सुरजीत सिंग (वय 34) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी या दोघांजवळ असलेले 11.80 ग्रॅम वजनाचे सुमारे 50 हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर तसेच त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
तळोजा येथील नावडे ब्रिजखाली दोन व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री सापळा लावला होता. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आरोपी कारमधून आले असता पोलिसांच्या पथकाने त्यांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता जरमन सिंग याच्याजवळ 7.27 ग्रॅम; तर रिम्पल सिंगजवळ 4.53 ग्रॅम ब्राऊन शुगर आढळून आली. पोलिसांनी दोघांविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.