आर्थिक साक्षरता शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। कोलाड । वार्ताहर ।
रा.जि.मध्यवर्ती सह. बँक अलिबाग व कोलाड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने द.ग. तटकरे माध्य. विद्यालय सुतारवाडी येथे विद्यार्थी आर्थिक साक्षरता शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात सहावी, सातवीमधील एकूण 67 विद्यार्थी व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर, कोलाड बँक शाखाधिकारी भावना सरफळे व कार्यालयीन प्रशिक्षक साजन पाटील यांनी बँकिंग व्यवहाराबाबत माहिती देताना बँकेचे कामकाज, विविध योजना, बँक व्यवस्थापन आदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी बँकेच्या होम सेव्हिंग्जमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी आपापली खाती उघडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तर, मुख्याध्यापक काळे व उपमुख्याध्यापक गायकवाड यांनीही विद्यार्थी वर्गाला बँकिंग व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल बँकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version