। चिपळूण/आळंदी । प्रतिनिधी ।
संत ज्ञानेश्वरांनी, एका ठिकाणी ‘नरगेचि रचावी, जळाशये निर्मावी महावने लावावी, नानाविधे।’ असे म्हटले आहे. यातील ‘नानाविध’ हा शब्द माऊलींनी पर्यावरणाचा विचार करता अतिशय सूचक वापरला आहे. एकाच प्रकारच्या झाडांच्या बागा लावल्या आणि ती झाडे संभाव्य रोगाला प्रतिकार करणारी नसली तर ती सर्वच्या सर्व कीडग्रस्त होतात. वेगवगळ्या प्रकारच्या झाडांमधील अशी प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. तेंव्हा कीड किंवा रोग पडला तरी सगळी झाडे नष्ट पाहू नयेत, या मागील माऊलींचा दृष्टीकोन संभवतो. कोणत्याही सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी मनुष्यामध्ये एक विशिष्ठ स्वभाव असावा लागतो. सध्याच्या जगासमोरील पर्यावरणीय संकट दूर सारण्यासाठी पर्यावरण जनजागरण-संवर्धन वर्तन हाही मानवी स्वभाव आणि संस्कार बनायला हवा आहे, असे मत पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन नुकतेच आळंदी येथे संपन्न झाले. यावेळी वाटेकर बोलत होते. संमेलनाध्यक्ष महाजन यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. आयोजक संस्था ही प्रमुख पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदीतील देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे रविवार (दि.29) संपन्न झालेल्या एकदिवसीय संमेलनप्रसंगी संमेलनाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे, माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे, निरंजनशास्त्री कोठेकर, प्रमोद मोरे यांच्या उपस्थित पार पडले.