| चिपळूण | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कुटरे जांभी नदीवरील पुलाच्या बाजूने नदीमधून तात्पुरता भराव केलेला रस्ता वाहून गेला आहे. त्याचा मोठा फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांची कामे रेंगाळली आहेत. चिपळूण शहरात महामार्गावर काहींच्या घरात पाणी शिरल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच, चिपळूणमधील अल्ताफ नाईक यांच्या घरावर वीज कोसळून घराचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे ग्रामीण भागात पुलांसह रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये कुटरे येथे सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने नदीत रस्त्यासाठी केलेला भराव वाहून गेला आहे. त्याचा फटका कुटरे गावातील खालची पेठ, तांबडवाडी, चिंचवाडी, होडेवाडी, शिर्केवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना बसला असून असुर्डे व सावर्डे येथे जाणेदेखील अवघड झाले आहे. तसेच, तळवडे, गोवळ, पाते येथील ग्रामस्थांना देखील ये-जा करण्याच्या दृष्टीने अडचणीचे झाले आहे. पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेला रस्ता पावसामुळे नदीतील पाणी वाढल्याने वाहून गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परंतु, आता अडकलेले ग्रामस्थ एकमेकांना हात देऊन सुरक्षितस्थळी जात आहेत. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.