| मंडणगड | प्रतिनिधी |
मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गांधी चौक येथील मराठी शाळेजवळील संरक्षण भिंत 22 मे रोजी पहिल्याच पावसात कोसळली आहे. विशेष म्हणजे या संरक्षण भिंतीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वीच केले होते. रात्रीच्यावेळी झालेल्या या घटनेत सुदैवाने अन्य कोणतीही दुर्घटना घडली नाही.
नगरपंचायतीच्यावतीने नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेच्या माध्यमातून येथील मराठी शाळेजवळ जांभ्या दगडाची संरक्षण भिंतीची निर्मिती करण्यात आली होती. या कामासाठी 6 लाख 46 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, केवळ सहा महिन्यातच ही संरक्षण भिंत कोसळल्याने भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत येथील रहिवासी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रात्रीच्या वेळी हि भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र, परीसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुरु झाल्यावर मुलांना, शाळा व्यवस्थापनास या पडलेल्या भिंतीमुळे त्रास होऊ शकतो. या कामासंदर्भात नगरपंचायतीने योग्य कार्यवाही करून संबंधितांवर कारवाईची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया या प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.