वीज देखभाल दुरुस्तीसाठी निसर्गाची हानी
। धाटाव । प्रतिनिधी ।
सध्या मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंग वाढलेले आहे. त्यामुळे वातावरणात उष्णतेची दाहकता अधिकच वाढत आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. अशावेळी पर्यावरणाचे रक्षण करणे व निसर्ग टिकवणे हे सर्वांचे काम आहे. शासन सुद्धा लक्ष घालत आहे. असे असताना रोहा तालुक्यातील रोठ परिसरात कोलाड-रोहा रोडवर पुढे येणाऱ्या पावसाळ्यासाठी वीज देखभाल दुरुस्तीचे काम करताना महावितरणने अनेक झाडांची कत्तल केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी प्रचंड दुखावले आहेत.
वीज वितरणचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. जंगल कपारीतून विद्युत वाहिन्या विद्युत पोल गेले आहेत. त्यामुळे साहजिकच झाडे झुडपे कापावी लागत आहे. पूर्वी देखील वितरणचे अधिकारी पावसाळ्यापूर्वी झाडे झुडपे कटिंग करत असत. यामध्ये खूप मोठी झाडे झुडपे कटिंग होत नव्हती. परंतु सध्या कोलाड-रोहा रोडवर मोठी झाडे सुद्धा कटिंग केलेली दिसून येत आहेत. महावितरणने काम करीत असताना थोडी झाडांची देखील काळजी घ्यायला हवी होती. परंतु हंगामी कामगार घेऊन खूप मोठे झाडांचे नुकसान व निसर्गाची हानी झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अधिकारी वर्गांचा व वितरण कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. पावसाळा आणि उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वीज गायब होते. गेल्या आठ-दहा दिवस पहाटे सकाळी विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे लहान मुले वृद्ध यांना प्रचंड उकाड्याचा त्रास होतो.
गेली कित्येक वर्षापासून विजेचा त्रास धामणसइ पंचक्रोशी ते मेढा परिसराला होत आहे. वेळोवेळी सत्तेतील राजकारणाकडे कैफियत मांडून सुद्धा सदर विजेचा खेळखंडोबा कमी झाला नाही.
