वातावरणातील बदलांमुळे साथरोग बळावतोय

| उरण | वार्ताहर |

वातावरणातील बदलामुळे व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या उरण तालुक्यात सर्दी, खोकला, ताप, काविळ आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. सदर रुग्ण हे सर्रासपणे खासगी रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

मागील वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यात सध्या वाढते तापमान व आर्द्रता यामुळे उरण तालुक्यातील रहिवाशांना सर्दी, खोकला, ताप काविळ यांनी ग्रासले आहे. तसेच ठिक ठिकाणी ओसाड जागेवर, डबक्यात, घरा जवळील उघड्या गटारात पाणी साचून राहत असल्याने डासाची संख्या बळावली आहे. सदर डास हे चावत असल्याने उरण शहर, चिरनेर, आवरे सारख्या इतर गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्ण हे सर्रासपणे कोप्रोली, उरण, पनवेल, सीबीडी येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन घेत आहेत.

तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बळावण्या अगोदर रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तसेच संबंधित शासकीय यंत्रणा यांनी सध्या योग्य प्रकारची उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमाणसातून करण्यात येत आहे. नाहीतर सोनारी, दिघोडे या गावांवर दोन वर्षांपूर्वी ओढावलेल्या डेंग्यू सारख्या आजाराची पुनरावृत्ती इतर गावात ओढावणार अशी भिंती सध्या गावा गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version