डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना

डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सुरू; पहिला पुरस्कार डॉ. कल्याण गंगवाल यांना

| महाड | उदय सावंत |

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ. के.एच. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. हा पुरस्कार मेडीजैन कम्युनिटीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर अर्थपूर्ण व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

नुकतेच झालेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त याअंतर्गत पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत पहिला पुरस्कार फिजिशियन डॉ. कल्याण मोतीलालजी गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. डॉ. कल्याण गंगवाल हे प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ज्ञ असून कॅरियम हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल यांसारख्या नामांकित संस्थांशी त्यांची कारकीर्द जोडलेली आहे. या पुरस्कार सोहळ्याला दर्शन आय केअर सेंटरचे संस्थापक डॉ. जिग्नेश तसवाला, संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती, मेडिजैनचे आश्रयदाता डॉ. पराग जैन, मानद अध्यक्ष डॉ.ज्योती संघवी, मानद सचिव डॉ. सोनल पालरेचा, मानद खजिनदार डॉ. आरती भटेवरा, संचेती हॉस्पिटलच्या होम हेल्थकेअर व संपर्क विभागाच्या संचालिका रूपल संचेती, अर्चना संचेती, संचेती ॲडव्हान्स्ड आर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख यशवंत शिवण्णा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती म्हणाले की, माझ्या वडिलांनी संचेती हॉस्पिटलची स्थापना ही “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या एका साध्या पण मोलाच्या विचारावर केली. त्यांनी आम्हाला नेहमीच हे शिकवले की, डॉक्टरांचे कर्तव्य हे केवळ रुग्णालयाच्या दारापर्यंत मर्यादित नसते. आजही ते रूग्णालयात येतात तेव्हा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना करत असतात. ज्यांचे कार्य केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, अशा डॉक्टरांचा डॉ. के.एच. संचेती मेडी रत्न पुरस्काराने गौरव केला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी आपल्या कार्यातून उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून डॉ. कल्याण गंगवाल हे योग्य व्यक्ती आहेत, असा आमचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version