राजीनाम्यानंतरही अ‍ॅड. महेश मोहिते यांची बॅनरबाजी

जिल्हा अध्यक्ष म्हणून केले विधानसभा अध्यक्षांचे स्वागत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सोलापूर येथील महिला प्रकरणानंतर भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते यांचा पक्षाने राजीनामा घेतला. मात्र त्यानंतरही पदाला चिकटून बसत कार्यकर्त्यांची दिशाभूल करत महेश मोहिते यांनी चोंढी येथे आलेल्या विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड राहुल नार्वेकर यांच्या स्वागताचे बॅनर झळकवताना रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महेश मोहिते यांचे हसे होत आहे.

दक्षिण रायगडचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यावर महिलेने आरोप करीत महिला आयोगाकडे न्याय मागितला होता. याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे जुलै महिन्यात भाजपच्या वरिष्ठांनी अ‍ॅड. महेश मोहिते यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेत त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला.

सध्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार उत्तर जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असे असतानाही अध्यक्ष पदापासून दूर राहणे मोहितेना जड जात आहे. त्यामुळे पदावरून हटवलेले असतानाही मोहिते अजूनही आपला अध्यक्ष म्हणूनच उल्लेख जाणीवपूर्वक करीत आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिशाभूल करीत चणेरा प्रकल्प ग्रस्तांना न्याय देण्यासाठी आपण पदापासून अलिप्त राहणार असल्याचा कांगावा केला होता. मात्र या बॅनर बाजीतून मोहिते यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे.

Exit mobile version