यांत्रिकीकरणाच्या युगातही बैलांच्या नांगराचे महत्त्व अबाधित

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पावसाळा सुरू झाल्याने सध्या बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगातही जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजुनही शेतीच्या कामासाठी बैलांच्या नांगराला पसंती देत आहे. जमीनीत खोलवर जाणारा नांगराचा फाळ, छोट्या व तुकड्यांच्या शेतासाठी उपयुक्त आणि बैलाला देण्यात आलेले महत्व यामूळे अजुनही बहुतांश शेतकरी नांगराचा वापर करत आहेत. जिल्ह्यात यंदा 95 हजार हेक्टरवर भात शेती केली जात आहे.
पावसाने हजेरी लावली आणि पेरणीसाठी जमीन नागंरणीला सुरुवात झाली. शिवाय आता भात रोपे उभी राहिली असून लावणीची लगबग देखील सुरू झाली आहे. जिल्ह्यातील भात शेती हि तुकड्यामध्ये विभागली आहे. तसेच डोंगर उताराला लागून असलेली व दुर्गम आणि दुरच्या पल्ल्यातील शेती तसेच शेताभोवती असलेले बांध यामुळे तेथे ट्रॅक्टर नेणे व नांगरणी करणे गैरसोयीचे होते. मात्र नांगर व बैल कुठेही सहज नेले जाऊ शकतात. बैल नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन अधिक भुसभूशीत करतो. त्यामूळे पेरणी करणे सोपे जाते. शेतात बैलाचे पाय पडणे हे अनेकांना शुभ वाटते. तसेच बैलाच्या पायामूळे तण व गवत मरतात यामुळे काही शेतकरी पेरणी व लावणीच्या दरम्यानच्या नांगरणीला बैलांच्या नांगराला पसंती देतात.

नांगर्‍याला मागणी अधिक
नांगरणी करणार्‍या शेतकर्‍यास किंवा मजुरांना नांगर्‍या म्हणतात. काही शेतकरी स्वतः आपल्या शेतात नांगरणी करतात. तर काही जण नांगर्‍याला बोलवितात. एक बैलजोडी व नांगरासह नांगर्‍याची मजूरी 700 ते 1000 रुपये प्रति दिवस आहे. जर पैसे नाही घेतले तर त्या बदल्यात नांगर्‍याकडे शेतीवर काम करण्यासाठी तीन-चार माणसे द्यावी लागतात. असा हा व्यवहार असतो. नांगर्‍याला मजुरी बरोबरच एक वेळची न्याहरी, जेवण व दोन वेळेचा चहापाणी द्यावे लागते. तरी देखील या नांगर्‍याला खुप मागणी आहे.

दरवर्षी शेतीसाठी बैलांच्या नांगरालाच पसंती देतो. ट्रॅक्टरपेक्षा नांगराने चांगली नांगरणी होते. बैलाच्या पायामुळे गवत व तण मरतात. मात्र नांगर हल्ली फारसे मिळत नाहीत. मजुरीही वाढली आहे.

-तुषार केळकर, शेतकरी, सुधागड


Exit mobile version