पेणमध्ये उभारणार इव्हीएम गोदाम

प्रांताच्या हस्ते भूमिपूजन, 10 कोटींचा खर्च अपेक्षित

| पेण | प्रतिनिधी |

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पेण येथे इव्हीएम मशीन साठवणूक गोदाम उभारले जाणार आहे. या गोदामाचे भूमिपूजन सोमवारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाले व प्रातं अधिकारी विठ्ठल ईनामदार यांच्या हस्ते हमरापूर शितोळेवाडी येथे करण्यात आले. या इमारतीसाठी 10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

रायगड जिल्हयातील ई.व्ही.एम मशीन साठवण्यासाठी स्वतंत्र गोडाउन नसल्याने अनेक वेळा अधिकारी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 10 कोटी 22 लाख 10 हजार 271 रुपये खर्च करून हे अद्ययावत गोदाम उभारले जाणार आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर खुटवड, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, पेण मुख्याधिकारी जीवन पाटील, पेण बांधकामचे अभियंता डी.एम.पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उद्योजक राजू पिचीका, उद्योजक प्रदिप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाले यांनी आपल्या मनोगतात ही इमारत का गरजेची होती, या विषयी सविस्तर माहिती सांगीतली. तर पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इव्हीएमची इमारत म्हणजे पेणच्या वैभवात भर असणार आहे. कारण पेण हे जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने उत्तम सोयी सुविधा असल्याने तसेच या इमारतीचा विचार करता ती उंच टेकडीवर असल्याने कोणताही धोका उद्भवणार नाही.

विठ्ठल इनामदार
प्रांत
Exit mobile version