| उरण | वार्ताहर |
शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेणार्या मुला-मुलींमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातील टपरी, किराणा दुकानात सहजरित्या हे एनर्जी ड्रिंक्स मिळत असल्याने मुलांमध्ये या ड्रिंक्सच्या सेवनाचे प्रमाण जास्त आहे.
बाजारात सहज उपलब्ध असणार्या एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. शाळा, परिसरात काही एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीला बंदी असतानाही विद्यार्थ्यांना ते सहज मिळत असते. याबाबत कारवाई व्हायला हवी, अशी मागणी, शिक्षक, पालकांसह जाणकारांमधून होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी ड्रिंक्सबाबत जागृती करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याचे प्रमाण गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एनर्जी ड्रिंकमध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
कॅफेनच्या जादाच्या मात्रेमुळे हायपरटेन्शन, कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे, मानसिक आरोग्य खराब होणे, हृदय व रक्त वाहिन्यांवर विपरित परिणाम होणे आदी समस्यांनाही सामोरे जाण्याची भीती असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ग्रामीणसह शहरी भागातील मुले व युवकांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याची क्रेझ वाढली आहे. आजारांचा धोका एनर्जी ड्रिंकमध्ये विविध प्रकारची रसायने असल्याने हृदयासंबंधी आजार बळावण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. एनर्जी ड्रिंक वारंवार सेवन केल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. त्यातून इतर आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. शाळकरी मुलांनी एनर्जी ड्रिंकऐवजी फळे व पौष्टिक आहार घेतल्यास त्याचा शारीरिक वाढीसाठी ते अधिक चांगले असते, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.