सिडकोचे दुर्लक्ष, नागरिकामध्ये नाराजी
| पनवेल | वार्ताहर |
खारघरमधील ‘सिडको’ने कॉर्पोरेट पार्ककरिता आरक्षित केलेल्या भूखंडावर आठवडी बाजार भरविला जात आहे. मात्र, या अनधिकृत आठवडी बाजारकडे सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर परिसरात सेक्टरनिहाय दादा मंडळींच्या सहकार्याने मैदान, रस्त्यावर आणि बस थांब्यासमोर आठवडी बाजार भरविला जात असूनही पनवेल महापालिका अधिकार्यांकडून डोळेझाक केले जात असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ओवे गावालगत ‘सिडको’ने कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी तार कुंपण केले आहे. मात्र, भूखंड भोवतालचे तार कुंपण काढून या भूखंडावर आठवडी बाजार भरविला जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव भूखंडावर काही नागरिकांना ढाबा, रेती, खडी, भंगार दुकाने तर काही नागरिकांनी वाहने धुण्याची दुकाने थाटली आहेत. सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण करुन त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करुनही त्याकडे सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर भूखंड सिडकोचा असल्यामुळे पनवेल महापालिकेचे अधिकारी कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमणाकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमणावर वरिष्ठ सिडको अधिकार्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.