डहाणूतील गर्भवतीसह बाळाचा मृत्यू
। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवतीसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (दि.27) डहाणू येथे घडला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंकी डोंगरकर असे मृत महिलेचे नाव असून ती डहाणू तालुक्यातील सारणी येथे रहात होती. मंगळवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर तिला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला गुजरातच्या वलसाड रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे रात्रीपासून तिला वलसाड येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, ऑक्सिजनसारख्या अत्यावश्यक सुविधा नसल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. या विलंबामुळे गर्भवतीच्या जीवाला धोका निर्माण झाला.
कासा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, डॉक्टर आणि उपचार सुविधा उपलब्ध नसलेल्या रुग्णवाहिकेतून पिंकीला नेणे चांगलेच महागात पडले. सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेतून वलसाड येथे घेऊन जात असतानाच गुजरातच्या भिलाडजवळ पोहोचताच पिंकीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. याआधीही आरोग्य व्यवस्था तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अशा अनेक गर्भवतींना बसला आहे. यातूनच त्या दगावल्याच्याही अनेक घटना समोर येत असतात. मात्र, अनेक बळी गेल्यानंतरही सरकार याविषयी गंभीर नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
108 सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
108 रुग्णवाहिका ही जीवनावश्यक सेवा असूनही ती तात्काळ उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण होत आहे. तर, उधवा येथे रुग्णवाहिका असतानाही ऑक्सिजनच्या अभावामुळे ती पाठवण्यात उशीर झाला. अशा घटनेमुळे 108 सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रुग्णवाहिकांचा अभाव तसेच देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्धच होत नाहीत. अशावेळी गोरगरीब रुग्णांसह अशा गर्भवतींना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.