। ठाणे । प्रतिनिधी ।
सिडको महामंडळाच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून योजनेचा प्रारंभ केल्यापासून सुमारे एक महिन्याच्या कालावधीत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसही 11 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिडकोतर्फे 11 ऑक्टोबर रोजी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता 26 हजार सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेसही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आजपर्यंत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता येऊन त्यांचे घराचे स्वप्न साकार व्हावे याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 11 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.