उत्पादन शुल्कचे 25 ठिकाणी छापे

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठ्यावर करडी नजर आहे; परंतु आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ऑक्टोबरपासून कडक कारवाई करत गेल्या पंधरा दिवसांमध्ये अवैध मद्यसाठ्याविरोधात 25 गुन्हे दाखल करून 4 लाख 41 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 21 जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची 4 पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसचे अवैध दारूधंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. या विभागाने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच 1 ते 14 ऑक्टोबर या कालावधीतही अवैध मद्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. या काळातील कारवाईत 80 गुन्हे दाखल झाले असून, 15 लाख 44 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 15 ऑक्टोबरपासून मोहीम तीव्र करण्यात आली. आठ ते दहा दिवसांमध्ये अवैध मद्याविरोधात 25 गुन्हे दाखल करून 4 लाख 41 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 9 हजार 605 लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

दृष्टिक्षेपात
देशी : 15.66 बल्क लिटर
गोवा मद्य : 41.22 बल्क लिटर
विदेशी मद्य : 4.86
नष्ट रसायन : 9,605 लिटर

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने अवैध मद्याविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली असून जिल्ह्यात येणार्‍या वाहनांची प्रमुख ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे.

– कीर्ती शेडगे, अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क

Exit mobile version