| पेण | प्रतिनिधी |
शिवजयंतीचे औचित्य साधून पेण गांधीमंदीर येथे आदर्श पतसंस्थेमार्फत एका स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक भावनेतून आदर्श पतसंस्था हि नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून पेण शाखेच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
आदर्श पतसंस्था पेण शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन दोन दिवस करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन
अॅड. मंगेश नेने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील, संजय राउत, अरविंद वनगे, अप्पा सत्वे, अशोक शिंदे, य.भी. तेरवाडकर, पेण शाखा व्यवस्थापक संतोष बुंदके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक सुरेश पाटील म्हणाले की, अलिबाग येथे पतसंस्थेच्या वतीने शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यातून विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. यावेळी अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आदर्श पतसंस्था नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असून यातून एखाद्या गरजू लोकांना मदत करणे, आरोग्य शिबीर भरविणे असे कार्यक्रम होत असतात. अनन्या ठेव योजनेद्वारे लहान मुलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होण्यास मदत होते असे सांगून या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शुभम चवरकर यांनी उपस्थित मान्यवरांना शस्त्राची पूर्ण माहिती दिली. या दोन दिवसाच्या प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी हजेरी लावली.