अपेक्षित निकाल, पण हुरळून जाण्याची गरज नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम पूर्ण झाला असून, पहिली गोष्ट या दोन्ही ग्रामपंचायतीबाबत तेथील जनतेत प्रचंड उत्सुकता होती. मात्र, तब्बल पावणे तीन वर्षे उशिराने होत असलेल्या या निवडणुकीने स्थानिकांना ग्रामस्थांना लोकनियुक्त प्रशासन मिळाले, परंतु या निवडणुकांच्या निमिताने कर्जत तालुक्यातील राजकारणाची दिशा मात्र वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारे निकाल आहेत. परंतु, या निवडणुकीचे एका ओळीत विश्‍लेषण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी हे निकाल अपेक्षित होते, मात्र या निकालाने जास्त हुरळून जाण्याची गरज या दोन्ही मित्रपक्षांनीदेखील नाही.

तालुक्यातील पोटल आणि पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायतीमधील निवडणुका झाल्या आहेत. पोटल ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन तयार झालेल्या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये तब्बल पावणे तीन वर्षे प्रशासन होता आणि त्यामुळे येथील जनतेला लोकनियुक्त प्रशासन हवे होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीमधील निवडणूक बिनविरोध करावी अशी चर्चा होती. मात्र, गावाच्या राजकारणात तालुक्याच्या राजकारण घुसले की गावाचे राजकारण देशपातळी गाठते आणि त्याचा प्रत्यय राज्यातील नव्या बदललेल्या समीकरणे यातून निर्माण झाला. या दोन्ही ग्रामपंचायतीमधील जनतेला आपल्या गावाचे राजकारण स्थानिक पातळीवरील नेते करायचे, परंतु यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते पोटल ग्रापंचायतमधील ग्रामस्थांनी पाहिले. तालुक्याचे बदललेले राजकारण याचा फटका कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील निवडणुकीत पाहायला मिळाला.

ज्या निवडणुका बिनविरोध होणे अपेक्षित होते, त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि ती निवडणूक सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे गाजली देखील. खरे तर, पोटल या ग्रामपंचायतीच्या दोन नवीन ग्रामपंचायती स्थापित झाल्या होत्या. त्यामुळे पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील ज्येष्ठ नेते वि.रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत बिनिरोध झाली. पण, पोटलमध्ये अनपेक्षितपणे निवडणूक झाली आणि तावून सुलाखून मतदारावर आमिषे दाखवूनदेखील मतदारांनी अपेक्षित निकाल दिले.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या पोटल ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात राजकीय चढाओढ होत होती. मात्र, राजकीय बदलत शिवसेनेचे दोन गट झाले आणि त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये तीन पक्ष निर्माण झाले. त्यात गेल्या काही वर्षात भाजपदेखील आपले अस्तित्व सांगून आहे. पण त्याही स्थितीत पहिली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणारे स्थानिक राजकारणी यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर निवडणूक होणार अशी स्थिती निर्माण झाल्यावर राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असे वाटले होते. पण तसे झाले नाही आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेना शिंदे गटाबरोबर युती न करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी मतदारांनी अपेक्षित निकाल देत महाविकास आघाडीला 100 टक्के यश मिळवून विजय मिळविला.

या विजयाने कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा बोलबाला सुरु झाला आहे. मात्र या महाविकास आघाडीमध्ये भाजप होता, हे विसरून चालणार नाही. त्याचे कारण शिवसेना शिंदे गट यांची ताकद कमी होती आणि त्यामुळे निकाल जसे अपेक्षित होते, तसे लागले आहेत. त्यामुळे निकाल अपेक्षित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी हुरळून जाण्याची अजिबात गरज नाही, हे सांगणारे हा निकाल निश्‍चितच आहे. आगामी काळात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. या वर्षेअखेरीस होणार्‍या या निवडणुकांसमध्ये महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.

Exit mobile version