| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील बोरिचामाळया परिसरात बिबट्याने एका बैलाचा फडशा पडल्यानंतर वनविभागाच्या पथकाने येथील परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. वन विभागाचे पथक बोरीचामाळ विभागातील परिसरात असून, या बिबट्याचा शोध घेत आहेत.
दि. 29 शेतकरी गणपत गायकर यांच्या मालकीचा बैल नेहमीप्रमाणे चारायला सोडला असताना घरी न आल्याने शोधा शोध केली असता, बुधवारी सकाळी बिबट्याने फस्त केल्याचे आढळून आले. यावेळी आजूबाजूला बघितले असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या शोधात येथील सारा परिसर पिंजून काढला आहे; परंतु बिबट्याचा शोध अजून लागलेला नाही. हा बिबट्या शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, वन खात्याकडून शोधमोहीम सुरू असली तरी मनुष्यबळ कमी असल्याचे दिसून आले. सध्या तरी तळ ठोकून बसलेला बिबट्या निदर्शनास येतो का, हे पाहात प्रत्येक वन विभाग कर्मचारी आपली ड्युटी बजावत आहे. बिबट्या हाती लागत नसल्याने रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे.