| म्हसळा | प्रतिनिधी |
श्रीवर्धन मतदार संघात बेरोजगारी आणि आरोग्य सेवेचा स्फोट झाला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांना नोकऱ्या वाटल्या जात असल्याच्या संतापातून 18 गाव आगरी युवा संघाने अखेर एल्गार पुकारला आहे. खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्ट पर्यंत निघालेल्या विराट बाईक रॅलीने संपूर्ण श्रीवर्धन-म्हसळा हादरला असून, “आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा“ असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. श्रीवर्धन मतदार संघातील समुद्रकिनारा वगळता इतर भागातील तब्बल 90 टक्के घरांना कुलूप लागले आहे. रोजगार नसल्याने तरुण आपल्या कुटुंबासह मुंबई-पुण्यात स्थलांतरित झाले आहेत. गावं ओस पडली आहेत, तर म्हातारे-कोतारे आरोग्य सेवेसाठी आजही मुंबई-पुण्याची वाट धुंडाळत आहेत. एकीकडे स्थानिक तरुण बेरोजगार म्हणून फिरत असताना, याच मतदार संघात दास ऑफशोर सारखी अवाढव्य जहाज बांधणी कंपनी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा दिघी पोर्ट आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांमध्ये स्थानिकांना लाथाडून परप्रांतीयांचे लोंढे भरले गेल्याचा गंभीर आरोप 18 गाव आगरी युवा संघाने केला आहे. हा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय असून या लढ्याची ही सुरवात असल्याचे अध्यक्ष ॲड. धनंजय चौलकर यांनी सांगितले. दरम्यान, या रॅलीपूर्वी स्थानिकांना रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालय, खरगाव, मेंडदी, बोर्ली व दिघी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन देण्यात आले.
श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट
