| माणगाव | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत श्रीवर्धन मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी आ. अदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे श्रीवर्धन मतदार संघातील 39 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले आहेत. या रस्त्यांमुळे श्रीवर्धन मतदार संघातील दुर्गम भागातील जनतेला दळणवळणाची सोय उपलब्ध होणार आहे.
श्रीवर्धन मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी ग्रामविकास मंत्र्यांच्याकडे मागणीचे पत्र दिले होते. त्यानंतर आमदार आदिती तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे श्रीवर्धन मतदार संघातील रोहा, माणगाव, तळा, श्रीवर्धन व मसळा या तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने रोहा तालुक्यातील तळवली तर्फ घोसाळे, फणसवाडी, वाळंजवाडी तर माणगाव तालुक्यातील चापडी-उणेगाव, निळगुण राजिवली रोड, ढालघर फाटा ते लोणशी मोहल्ला या रस्त्यांचा समावेश आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातील गोळवाडी-कोंडे पंचतन- वांजळे हरिजनवाडी रस्ता, तर मसळा तालुक्यातील इजिमा 128 ते भेकर्याचा कोंड या रस्त्याचा समावेश आहे.
तळा तालुक्यातील प्रामुख्याने खैरत तांबडी, रोवळा अदिवासीवाडी, म्हसाडी रोड व सालशेत ते किस्तकेतकी रोड हे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यांचे सर्व्हेक्षण सुरु झाले असून लवकरच रस्त्यांची कामे सुरु करण्याविषयी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व संबंधित यंत्रणा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सदरचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार असल्याने श्रीवर्धन मतदार संघातील या दुर्गम भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होणार आहे.