पूरस्थिती रोखण्यास सार्वजनिक बांधकामला अपयश

अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील औद्योगिकीकरण म्हणजे निसर्ग कोप होण्यासाठी पूरक परिस्थिती असे काहीस झाले आहे. डोंगर, शेती, समुद्राच्या पाण्यावरील अतिक्रमण ही सारी कारणे निसर्ग कोपास पुरेशी आहेत.

याच औद्योगिकीकरणाचा एक भाग म्हणजे कंटेनर यार्ड. मोठमोठ्या गोडाऊनचे वाढते प्रमाण आणि त्यांनी हे यार्ड उभे राहण्यासाठी मोठमोठे केलेल्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नाही. या सर्वांवर सार्वजनिक बांधकाम खात्याचा अंकुश असणे गरजेचे आहे. पण, नेमके इथेच पाणी मुरत आहे. याकरिता पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे, रस्त्यावर पाणी बाहेर पडण्यासाठी मोर्‍या बांधलेल्या असतात, त्या मोर्‍याच भरावामुळे गायब झाल्या आहेत. मग पाणी जाणार कुठून?

गव्हाण फाटा-दास्तान-दिघोडा येथील या मोर्‍या गोडाऊनच्या भरावामुळे दबल्या गेल्या आहेत, त्यामुळे या भागातील जांभुळपाडा व आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाण्याचे मोठेच्या मोठे प्रवाह वाहात आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण होत आहे. याशिवाय रस्त्यांची धूप होऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मागील पाच-सहा वर्षांपासून हीच स्थिती आहे. या सर्व गोष्टींकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे आज पूरपरिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version