अंबा नदीकाठच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

गोठा कोसळून गायीचा मृत्यू

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

अतिवृष्टीमुळे पाली आणि परिसराला मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत पाली येथील अंबा नदी शेजारी शेती करणारे शेतकरी तुषार ठोंबरे यांच्या शेतातील सौर पॅनेल निकामी झाला आहे. तर गोठा कोसळून गायीचा मृत्यू झाला आहे. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

अंबा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. सद्यस्थितीलाही ठोंबरे यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शेतात बसवलेला सोलर पॅनेल पूर्णपणे पाण्याखाली बुडाला. पाण्यामुळे हा महागडा सौर पॅनेल आता पूर्णपणे नादुरुस्त आणि निकामी झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका केवळ पिकाला किंवा उपकरणांनाच बसला नाही, तर त्यांच्या गोठ्यावरही कोसळला. अतिवृष्टीमुळे पाण्याचा जोर वाढल्याने त्यांचा गुरांचा गोठा जमीनदोस्त झाला. गोठा कोसळल्याने दुर्दैवाने गोठ्यात बांधलेली एक गाय मरण पावली आहे. सौर पॅनेलचे नुकसान, गोठ्याची पडझड आणि पाळीव जनावराचा मृत्यू यामुळे तुषार ठोंबरे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका बाजूला पिकांचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूला उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तातडीने पंचनामा करावा आणि तात्काळ योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी आर्त मागणी शेतकरी तुषार ठोंबरे यांनी केली आहे.

Exit mobile version