भेरव अंबा नदी पुलावरूनही पाणी; मुंबई व पुणे संपर्क बाधित
। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।
परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. 8) सलग तिसऱ्या दिवशी वाकण जवळील मार्गावर पूरपरिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तसेच अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यावर पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, वाकण-पाली मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा एकदा पूर्णपणे ठप्प झाला आहे.

पावसाचा जोर कायम असल्यामुळे भेरव येथील अंबा नदीला मोठा पूर आला असून, नदीचे पाणी थेट पुलावरून वाहत आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुलावरून पाणी जात असल्यामुळे या भागातील संपर्क पूर्णपणे तुटला असून वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि पाण्याचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग हा मुंबई- पुणे दृतगती मार्ग, मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- बेंगलोर या महत्त्वाच्या महामार्गांना जोडतो. त्यामुळे या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावरती प्रवासी व माल वाहतूक होते. रहदारीचा असणारा हा रोड पावसाळ्यात वारंवार ठप्प होत असल्याने प्रवाशी, नागरीक, विद्यार्थी आणि व्यवसायिक यांचे मोठे नुकसान होत आहे.
महत्वाच्या कामासाठी वडखळ वरून पाली येथे जाण्यासाठी आलो होतो. मात्र, वाकण जवळ आल्यावर पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद झाला, त्यामुळे पुन्हा पाठी फिरावे लागले.
गिरीश म्हात्रे
प्रवासी






