हुतात्म्यांच्या चिरनेरभूमीतून आंदोलनाची हाक
| चिरनेर | प्रतिनिधी |
सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवनगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत, कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकर्यांना विश्वासात न घेता या परिसरातील शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्याला तीव्र विरोध करण्यासाठी व आपल्या न्याय्य हक्कासाठी एमएमआरडीए विरोधी समितीची स्थापना करून या परिसरातील शेतकरी एकवटले असून, आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांनी शनिवारी (दि.18) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महागणपतीचे दर्शन घेऊन चिरनेर गावातील हुतात्म्यांच्या पावन झालेल्या भूमीतून या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची हाक गाव बैठकीच्या माध्यमातून दिली आहे.
उरण, पनवेल, पेण 124 महसुली हद्दीतील गाव क्षेत्रात एमएमआरडीएने तिसरी मुंबई उभारण्याचा घाट घातला आहे. या प्रस्तावित तिसरी मुंबई उभारण्यासाठी शासनाने येथील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. जमिनी देणार की नाही याबाबत शेतकर्यांशी चर्चा, विचारविनिमयही केलेला नाही. असे असतानाही शेतकर्यांना अंधारात ठेवून शासनाने भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. याविरोधात निषेध, व्यक्त करीत 25 हजारांहून अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
2005 साली राज्यातील महाआघाडी सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील शेतकर्यांना विश्वासात न घेता रिलायन्स एससीझेडच्या माध्यमातून महामुंबई प्रकल्प निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत, माजी न्यायमूर्ती श्री. कोळसे पाटील, कॉ. विलास सोनावणे, अॅड. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांनी आंदोलन, न्यायालयीन लढाई लढत सरकारचे मनसुबे उधळून लावले होते. आज भाजपा महायुतीच्या सरकारनेपुन्हा एकदा तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेत आहे. एकंदरीत, कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकर्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकर्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घालत आहे.
त्यामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांतील घरे, गावे आणि शेतजमीनी संकटात येणार आहेत. त्याविरोधात माजी न्यायमूर्ती श्री. कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी गावनिहाय बैठकीचे आयोजन करण्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केला. त्याची सुरुवात हुतात्म्यांच्या पावन झालेल्या चिरनेर भूमीतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या महागणपतीचे दर्शन घेऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करून एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी शेतकर्यांच्या उपस्थितीतकेली आहे.
या बैठकीत संघर्ष समितीचे समन्वयक रुपेश पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील, राजिप माजी सदस्य महेंद्र ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, उरण पं.स. माजी उपसभापती शुभांगी पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर ग्रा.पं. सदस्य समाधान ठाकूर, भारती चिर्लेकर, मृणाली ठाकूर, समुद्रा म्हात्रे, वनिता गोंधळी, यशोदा कातकरी, निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी श्रीधर मोकल, माजी उपसरपंच अनिल केणी, चिरनेर ग्रा.पं. माजी सदस्य रमेश फोफेरकर, मंगेश पाटील आणि विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तिसर्या मुंबईला विरोधच
या बैठकीत प्रस्तावित तिसर्या मुंबईला कायमच विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. बलाढ्य मुकेश अंबानी यांच्या महामुंबई सेझला शेतकर्यांनी परतवून लावले होते. त्याचप्रमाणे तिसर्या मुंबईच्या निर्मितीविरोधात आरपारची लढाई छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांतील घरे, गावे आणि शेतजमिनी संकटात येणार आहेत. त्याविरोधात माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी गावनिहाय बैठकीचे आयोजन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
– सुधाकर पाटील, अध्यक्ष,
एमएमआरडीए विरोधी समिती