रस्त्याशेजारी शोभेची झाडे विकणार्यांचे साम्राज्य
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणार्या मार्गाशेजारी असलेल्या कांदळवन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असा इशारा देणारे फलक मुंबई कांदळवन संधारण घटक या महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकावरच अतिक्रमण करण्याचा प्रकार शोभेची झाडे विकणार्या विक्रेत्यांनी केला असून, रस्त्या शेजारील पादचार्यांचा पदपथदेखील या विक्रेत्यांनी काबीज केला आहे.

पालिका हद्दीतील पदपथावर अतिक्रमण करणार्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा धडाका पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे लावण्यात आला आहे. पालिका हद्दीतील सर्वच प्रभागात ही कारवाई सुरु आहे. मात्र, त्याचवेळी प्रभाग क्रमांक क मधील मानसरोवर रेल्वे स्टेशन तसेच खान्देश्वर रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर तसेच पदपथावर शोभेची झाडे विक्री करणार्या विक्रेत्यांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अभय देण्यात आले आहे का, असा सवाल परिसरातील परिस्थिती पाहून उपस्थित केला जात आहे.
मोठ्या संख्येने फळझाडे अथवा बियाण्यांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, पालिका हद्दीत फळझाडे आणि बी-बियाणांच्या पाकिटांची विक्री करणार्यांकडे याबाबतची कोणतीही परवानगी नसल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेचे वृक्षप्राधिकरण विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आल्याने अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या विक्रेत्यांचे फावले आहे.
कांदलवन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
कांदळवन क्षेत्रात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4/20 अन्वये अधिसूचीत राखीव वन घोषित केले आहे. या क्षेत्रात अपप्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे फलक या भागात लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवरच झाड विक्रेत्यांनी अतिक्रमण केल आहे.
विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेला भूखंड कांदळवन विभागाच्या अख्त्यारीत येतो. त्या ठिकाणी कांदळवन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. पदपथ आणि रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर पालिका कारवाई करेल.
– रविकिरण घोडके, उपायुक्त, पनवेल