विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिलेली नाही. याविरोधात येथील शेतकर्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी येथील स्थानिक, शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांनी दि. 1 एप्रिलपासून बेणसे सिध्दार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषणास बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता कुथे, कल्पना अडसुळे, योगेश अडसुळे, सचिन कुथे, हे चार जण आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणकर्त्यांना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमीपुत्रांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, उपाध्यक्ष विजय एटम, माजी सरपंच आ.का. म्हात्रे, दत्तात्रेय सुरावकर, शेतकरी सदानंद पाटील, मीराबाई गोरे, विठाबाई माळी, तुळसाबाई तरे, आसिफ मोमीन, संदीप कुथे, नंदा अडसुळे, उषा पवार, रेणुका अडसुळे, निकिता अडसुळे, सुषमा अडसुळे, मनोज कुथे आदींसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन आश्वासने देत आहे, यातून प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही तक्रार व मागणीवर रिलायन्स व्यवस्थापन न्यायिक भूमिका घेत नसल्याचे बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितले. आमच्या मागण्या जलदतेने मान्य केल्या नाहीत तर येत्या दोन दिवसात अधिक उग्र आंदोलन करू, असा इशारा माजी सरपंच आ.का. म्हात्रे यांनी दिला आहे.
बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पसंदर्भात संघर्ष समिती व रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात उमंग, इस्टेट ऑफिस, व प्रांताधिकारी कार्यालय पेण येथे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व नागरिक यांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत वारंवार बैठका होऊन आश्वासने देऊन सकारात्मक चर्चा होऊनदेखील आजतागायत एकही विषय मार्गी लावला नाही. आंदोलनकर्त्यांनी तक्रारी अर्जाद्वारे मंत्रालय स्तरावर, तसेच रायगड जिल्हा व तालुका प्रशासनाकडे प्रामुख्याने नमूद दिलेल्या मागण्यांत ई.डी.पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकर्यांचे, मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे व आजही होत आहे. या नुकसानग्रस्त घटकांची आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते, मात्र आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच नवीन प्रकल्पाच्या मातीच्या भरावामुळे सर्व व्यवसायिक व शेतकरी यांचे कायमस्वरूपी नुकसान होणार असल्यामुळे या घटकाला उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शिक्षण व गुणवत्तेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केले होते, तसेच बीएससी, डिग्री, डिप्लोमा व आयटीआय व फायर मॅन यांना सध्या चालू असलेल्या रिलायन्स कंपनीत कामाला कायम स्वरूपी सामावून घेण्याचे मान्य केले होते, त्या सर्व मुलांची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.
दिलेली आश्वासने, प्रलंबित मागण्या व समस्या यांची सोडवणूक न करता पोलीस बळाचा वापर करून स्थानिक शेतकरी, मच्छिमार, पशुपालक अन्नदाते यांना धमकावू नये. मातीच्या भरावाने बेणसे झोतीरपाडा व अन्य नागोठणे विभागात महापूर परिस्थिती अधिक उद्भवण्याची भीती आहे, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन यांनी प्रभावी व ठोस उपाययोजना करावी. जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवावे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा देत वरील मागण्यांच्या अनुषंगाने शेतकरी व स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे. उपोषणादरम्यान आमच्या जीविताला काही हानी अथवा धोका निर्माण झाल्यास त्यास रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.