चिंचवली, भानसोलीतील अनेक घरांना धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेले रेल्वे गेट बंद होणार असून या भागात उड्डाणपूल उभारला जाणार आहे. मात्र, या उड्डाणपुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, या प्रस्तावित उड्डाणपुलामुळे चिंचवली आणि भानसोली गावातील अनेक घरांनादेखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी या उड्डाणपुलाला विरोध केला आहे.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळील चिंचवली येथे रेल्वे गेट क्रमांक 23 आहे. सध्या वाढलेल्या वाहनांमुळे त्या ठिकाणी असलेल्या फाटक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वेने नोटीस बजावली असली, तरी या प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांना शासनाने जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. तसेच, पुलाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे होणार आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य कमी होऊन ती निरुपयोगी ठरणार आहे. अशा जमिनींचाही विचार करून योग्य दर द्यावा. तसेच, ज्या शेतकऱ्यांकडे अत्यल्प जमीन शिल्लक राहणार आहे, ती संपूर्ण जमीन रेल्वेने ताब्यात घेऊन त्याचा योग्य मोबदला द्यावा. या उड्डाणपुलामुळे केवळ शेतीच नाही, तर गावातील सामाजिक आणि धार्मिक बाबींवरही या पुलाचा परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे गावातील अंत्यविधीसाठी जाताना ग्रामस्थांना 2-3 किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी रस्ता किंवा भुयारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
धार्मिक सोहळ्यांच्या मिरवणुकीत अडथळा दरवर्षी होणारा गोविंदा उत्सव, गणपती विसर्जन आणि श्रीरामाची पालखी यांसारख्या धार्मिक सोहळ्यांच्या मिरवणुकीत या पुलामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, परिसरातील शाळा आणि मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासावर याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व तांत्रिक आणि सामाजिक समस्यांचा सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती चिंचवलीकर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन संभाव्य बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार यांना दिले आहे.
