तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यात भातशेती लावणीच्या कामात सध्या बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावून पुन्हा मधेच दडी मारल्याने शेतीच्या कामात अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना धुळवाफ्याची पेरणी करताच आली नाही. अनेकांनी चिखलपेरा केला तर काहींनी राहू पध्दतीने पेरणी केली.

तळा तालुक्याचा भाग हा अधिक प्रमाणात डोंगराळ वरकस भातशेतीचा आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने तळ्यामध्ये जुलै महिन्यापासून भात शेतीच्या लागवडीला सुरूवात झाली. यावर्षी तालुक्यात 1050 हेक्टरवर भातशेतीची लावणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत तळा तालुक्यात अंदाजे सरासरी 50 टक्केपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत परिस्थिती समाधानकारक असून, शेतकरीवर्ग लावणीच्या कामात व्यस्त आहे. अंदाजे 10 दिवसांत लावणीची कामे आटोपतील असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

पाऊस आजपर्यंत चांगला पडत आहे. त्यामुळे शेती चांगली आहे. तालुक्यात भातशेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही शेतकरी वर्ग वापर करत असून, चारसूत्री भातशेती लागवड, सामुहीक शेती, बचतगटांनी केलेली सामूहिक शेती यामुळे अनेक दृष्टीने वेळ व मजूरांची बचत होते. त्याच बरोबर उत्पन्नातही वाढ होत असल्याने शेतकरीवर्ग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक शेतीकडे वळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Exit mobile version