तळवली ग्रामस्थांचे लेखी निवेदन
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
तळवली गावातील जीवन प्राधिकरण नळ योजनेच्या कामामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाबाहेरील शेतजमिनींकडे जाणारा रस्ता सुमारे दोन महिन्यांपूर्वी खोदण्यात आला असून, अद्याप त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे कठीण झाले असून, शेतीच्या हंगामात त्यांची चिंता वाढली आहे.
सध्या जून महिना सुरू असून, पावसाळी पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत. मात्र, रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने बैलजोडी, नांगर तसेच इतर यांत्रिक शेती अवजारे शेतापर्यंत नेणे शक्य होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शेतीची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात तलवली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात खोदकाम केलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अथवा पाईपलाईनचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असली तरी तिच्या संथ कामकाजाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खोदकाम करून अनेक दिवस उलटून गेले असतानाही संबंधित कंत्राटदाराने पुढील काम सुरू केले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्ता खोदून ठेवल्यानंतर कंत्राटदार त्या ठिकाणी फिरकलाच नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर नळ योजना 2023-24 या कालावधीत मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्ष कामाला 2026 मध्ये गती मिळाल्याचे सांगितले या खोदलेल्या रस्त्यामुळे “आम्ही शेतीची लागवड करायची की नाही?” असा संतप्त सवालही येथील शेतकरी उपस्थित करत आहेत.
तळवली गावात जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेसाठी करण्यात आलेले खोदकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे तसेच बैलजोडी शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित कंत्राटदाराला दोन दिवसांत खोदलेला रस्ता भराव करून शेतकऱ्यांसाठी मार्ग मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा ग्रामपंचायत प्रशासन स्वतः जेसीबीच्या साहाय्याने भराव करून मार्ग खुला करेल.
विनोद चांदोरकर,
खालापूर प्रशासक
जीवन प्राधिकरण योजनेसाठी शेताकडे जाणारा रस्ता खोदण्यात आल्याने शेतीची यंत्रसामग्री व बैलजोडी शेतात नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांची लगबग वाढली असून, वेळेत कामे न झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने तातडीने खोदकाम केलेला मार्ग भरून शेतकऱ्यांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा.
भरत मालकर,
शेतकरी तळवली
