आत्मदहन करण्याचा इशारा
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस लाईन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना योग्य मोबदला न दिल्यास या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याबरोबरच आत्मदहनही करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. गेल्या 4 वर्षापासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे आली आणि शेतकर्यांना फसविले. जो मोबदला शेतकर्यांना सांगण्यात आला त्यानुसार जमिनीचा मोबदला दिला नाही. काही शेतकर्यांना जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आला नाही .गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पात गेलेल्या जमिनीची नासधूस तसेच कोणतेही उत्पन्न घेता येत नाही.
रिलायन्स इथेन गॅस दहेज ते नागोठणे पाईपलाईनमध्ये अवसरे, बीरदोले, कोदिवले, तळवडे, पंपलोळी आदी गावातील अन्यायग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या नुकसान भरपाई साठी या लढ्यात सामील झालेले आहेत. रिलायन्स विरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून त्यात लवकरात लवकर मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले पण आजतागायत कुठलाही मोबदला आला नाही.. बरेचदा उडवा उडविची उत्तरे देण्यात आली. जीव देऊन जर न्याय मिळणार तर चालेल पण मग हटायचे नाही असा निर्धार शेतकर्यांनी केला असून या प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे केशव तरे यांनी रिलायन्स सह, सक्षम प्राधिकारी आणि प्रशासनाला इशारा दिला आहे.