कडधान्य, भाजीपाला लागवडीला प्राधान्य
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या खाडीपट्टयात आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. रविवारपासून सकाळी हलकीशी थंडी पडायला सुरुवात झाली असून, भात कापणी आटोपलेल्या शेतकऱ्यांनी आता दुबार शेतीकडे मोर्चा वळवला आहे. दुष्काळाने होरपळूनही न खचता खाडीपट्टयातील शेतकरी राजा पुन्हा एकदा शेतात रमला आहे. भाताचे पीक हातातोंडाशी येऊनही पावसाने दगा दिल्याने मोठे नुकसान झाले. तरीही खचून न जाता शेतकऱ्यांनी आता वाल, पावटा, तूर, मूग आणि इतर कडधान्यासह भाजीपाल्याच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे.
खाडीपट्टयातील कडधान्यामधील वाल रायगड जिल्ह्याच्या बाजाबाजारात पोहोचतो. येथील वालाला विशेष मागणी असते. त्यामुळे भात कापणी होताच शेतकऱ्यांनी वालाच्या बियाण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. ओवळे, वलंग, गोमेंडी, चिंभावे, तेलंगे, आदिस्ते, सोनघर, रावढळ परिसरात सध्या शेतात नांगरट, वाफे तयार करण्याची लगबग दिसत आहे. यंदा पेरणीच्या वेळी पाऊस लांबला. नंतर दुबार पेरणी केली, तेव्हाही पाऊस कमीच पडला. ऐन हंगामात पाऊस गायब झाल्याने निटसा कापणीच्या तोंडावर तर पाऊस गायबच झाला. ज्यामुळे भात पीक चांगले तयार झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे महासंकट कोसळले.
सरकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी स्वबळावर कापणी उरकली आणि आता पुन्हा दुबार शेतीत उतरले आहेत. भात शेतीत झालेल्या नुकसानीची भरपाई दुबार शेतीतून होईल, अशी आशा आहे. मात्र पुन्हा कोणतेही नैसर्गिक संकट उभे राहू नये, एवढीच अपेक्षा आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी थंडीने हजेरी लावल्याने दिवाळीचा आनंद आणि शेतात दुबार पिकाची लगबग, असे चित्र सध्या खाडीपट्टयात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दुबार शेतीच्या कामात यंदा महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. सकाळी थंडी असतानाही महिला शेतात वाफे तयार करणे, बियाणे टोकणे, पाणी देणे या कामात आघाडीवर आहेत. भात कापणीच्या काळात कुटुंबासह राबणाऱ्या या महिला आता पुन्हा दुबार शेतीसाठी सज्ज झाल्या आहेत. शेतकरी कुटुंबाची हीच जिद्द खाडीपट्टयाची खरी ओळख आहे.
