नेरळ-कळंब रस्त्याचे काम बंद पाडले

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान-कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहण आणि भूसंपादनाच्या मुद्द्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी माजी सभापती धोंडू राणे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचे काम बंद पाडले आहे.

माथेरान-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ ते कळंबपर्यंत काँक्रीटीकरणाचे काम एमएसआयडीसीकडून सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरणाची कामे बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्य मालकीचा असून, रस्त्याच्या जमिनीचे अधिग्रहण बांधकाम खात्याने केलेले नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याच्या बाहेर जाऊन जमिनीवर काँक्रीटीकरण करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण कामे सुरू झाल्यापासून स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्याचे रुंदीकरण करून कामे करण्यास हरकत घेतली आहे. मात्र, त्यानंतर संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करण्यासाठी पोलीस बळाचा वापर सुरू केला. त्यामुळे शेतकरी संतापले असून, त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी, आमच्या जमिनीचे यापूर्वी भूसंपादन झाले असल्याची कागदपत्रे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दाखवावी, अशी मागणी केली. ती कागदपत्रे शेतकऱ्यांना दाखवल्याने समाधान झाल्यास कोणीही शेतकरी रस्त्याचे काम थांबवून ठेवणार नाही, असे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता यांना नेरळ येथे बोलावून घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी कामात कोणताही अडथळा निर्माण केला नाही; मात्र, आठवडा लोटला तरी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता हे नेरळ येथे येऊन शेतकऱ्यांना भेटले नाहीत. अखेर बीरडोळेपासून पोही भागातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्याचे काम बंद पाडले असून, रस्त्यावरील सर्व मशिनरी बाजूला करून ठेवण्यात आल्या. त्याचवेळी रस्त्याच्या कामाला रात्री सुरुवात करू नये, असा सज्जड दम देत जोपर्यंत कार्यकारी अभियंता शेतकऱ्यांंची भेट घेत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम करू नये, अशी सूचना संबंधित ठेकेदारांना करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version