। माणगाव । सलीम शेख ।
हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकर्यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीची घाई सुरू झाली आहे. विशेषतः रायगड, कोकण व घाटमाथ्याच्या भागात शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनिश्चिततेमुळे या दोन्ही हंगामात समतोल राखणे शेतकर्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः माणगाव तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरील रब्बी हंगामातील भाताचे पीक अजूनही शिवारातील शेतात उभे असताना, खरीपपूर्व तयारीचा ताण वाढल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
रब्बी भाताचे पीक मार्च-एप्रिलमध्ये तयार होते; परंतु त्यावेळी उन्हाळ्याची तीव्रता, पाण्याची कमतरता आणि मजुरांची टंचाई या गोष्टी पिक काढणीला विलंब घडवतात. दुसरीकडे, खरीप हंगामासाठी मे पासूनच जमिनीची नांगरणी, खते व बियाण्यांची व्यवस्था, पाण्याचा स्रोत निश्चित करणे आदी कामे सुरू करावी लागतात. अशा स्थितीत एकाच वेळी दोन हंगामांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे आर्थिक व मानसिक ताण निर्माण करणारी गोष्ट ठरते. याशिवाय रब्बी पीक वेळेवर न काढल्यास पुढील हंगामासाठी लागणारी शेतीची मशागत होऊ शकत नाही, परिणामी खरीप पीक वेळेवर लावता येत नाही. याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि उत्पन्नावर होतो. यंदा अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे संकेत पुढील आठवड्यात केरळात आणि नंतर कोकण, विशेषतः रायगड जिल्ह्यात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी शेतकर्यांनी नांगरणी, पाण्याच्या साठ्यांची तयारी व बियाणे खरेदी आदी कामांना वेग दिला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असतो. भात, नागली, वरी, आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी मान्सूनच्या पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जाते.
जिल्ह्यात भातशेती हे प्रमुख पीक असल्याने शेतकरी शेतसिंचन आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा यावर भर देताना दिसत आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याचे अंदाज हे शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून, राज्य सरकार आणि कृषी विभाग यांच्याकडून पीकविमा, बी-बियाण्यांचे वाटप आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. काही भागांत कृषी महोत्सवाचे आयोजन करून आधुनिक शेतीच्या पद्धतींबाबत जागरूकता वाढवली जात आहे. मात्र, अनियमित हवामान, चक्रीवादळांची शक्यता आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकर्यांमध्ये काहीशी अस्वस्थतादेखील आहे. तरीही नैसर्गिक लहरींना सामोरे जात शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने, श्रमाने आणि चिकाटीने खरीप हंगामाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अंदमानात लवकरच मान्सून दाखल होणार असल्याने आणि केरळ व रायगडमध्ये पावसाची चाहूल लागल्याने शेतकर्यांच्या हालचालींना गती मिळाली आहे.