। खांब । वार्ताहर ।
‘ज्ञानप्रबोधिनी पुणे’ आणि ‘श्री विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा’ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या वर्षभरात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या ‘स्वयं अध्ययन कौशल्य प्रशिक्षण उपक्रम’ला अभूतपूर्व यश मिळाले असून या उपक्रमाचे फलित म्हणून आत्मनिर्भर विद्यार्थी घडवले आहेत. या उपक्रमामागे ज्ञानप्रबोधिनीच्या शास्त्रशुद्ध, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाची प्रेरणा होती.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वतः शिकण्याची क्षमता आहे, यावर आधारित हे प्रशिक्षण त्यांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन गेले. या प्रशिक्षणात रोहातील 18 शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने अभ्यासाची सवय लावली, नियोजनपूर्वक अभ्यास केला आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे गेले. यामधून रुचिता मांडलेकर 91.80 टक्के, प्रांजल येळकर 90.80 टक्के, तनिष्का पेटकर 90.80 टक्के, श्रावणी लाडगे 90.40 टक्के तर प्रीतम मोरे 90.00 टक्के अशाप्रकारे 5 विद्यार्थी 90 टक्के अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 18 शाळांपैकी 8 शाळांनी 100 टक्के निकाल प्राप्त केला. हे यश सहज मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे सातत्य, चिकाटी आणि स्व-अभ्यासाच्या शिस्तीचा अवलंब केला. यामागे ज्ञानप्रबोधिनीचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे परिश्रम, आणि स्थानिक शाळांच्या शिक्षकांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा संयुक्त परिणाम असल्याची प्रतिक्रिया सुशील रूळेकर यांनी दिली.