महामार्गांवरील कंटेनर वाहने हटवली
। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणार्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील जड कंटेनर वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गानी मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी मार्गावरील दुचाकी व लहान वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
या मार्गावर उभी करण्यात येणार्या जड कंटेनर वाहनांमुळे होणार्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. या विरोधात उरणमधील सामाजिक संस्थांनी नवी मुंबई वाहतूक विभागाला निवेदन देताच, नवीमुंबई वाहतूक उपायुक्तांनी जेएनपीएमध्ये बैठक घेऊन जड वाहने हटवून मार्ग मोकळे करा अन्यथा कारवाई करू अशी तंबी दिली होती. त्यानंतर उरणच्या वाहतूक विभागाने मुख्य व सेवा मार्गावरील कंटेनर वाहने हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे मार्ग मोकळे होऊ लागले आहेत.
जेएनपीए बंदरातून दररोज 15 हजारापेक्षा अधिक जड कंटेनर वाहने जेएनपीए बंदर ते पळस्पे व जेएनपीए ते आम्रमार्ग नवी मुंबई या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करीत आहेत. अनेक वाहने बेदरकारपणे वाहतूक करतात. याचा फटका प्रवास करणार्यांना बसतो.