भाजपा आमदारांने दिला सरकारला घरचा आहेर
| रायगड | खास प्रतिनिधी |
मुंबई-गोवा मार्गावरील एका मार्गीकेचे काम सुस्थित करुन तो गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे. मात्र सुस्थितीत असणाऱ्या मार्गावरुन कोकणात गेलेल्या गणेशेभक्तांनी परतताना खड्ड्यातून प्रवास करायचा काय, असा सवाल भाजपाचे आमदार रविंद्र पाटील यांनी करुन भाजपाला घरचा आहेर दिल्याचे दिसून आले. या मार्गावरील खड्डे तातडीने डांबराने भरण्यात यावेत, अशी आक्रमक भूमिका देखील आमदार पाटील यांनी घेतली.
गणेशोत्सव आणि इद-ए-मिलाद हे सण काहीच दिवसांवर आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सर्वच सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रस्त्याच्या प्रश्नावरुन संबंधित यंत्रणा या निरुत्तर झाल्या होत्या. गणेशोत्सवाचा सण कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावी सण साजरा करण्यासाठी जातात. गेल्या 12 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था काही केल्या संपलेली नाही. या वर्षी पनवेल ते इंदापूर पर्यंतचा रस्ता सुस्थित करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. या मार्गाची पाहणी करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत तब्बल चार वेळा पाहणी दौरा केला आहे. (26 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 14 जुलै) महामार्गाची एक लेन गणेशोत्सवाच्या आधी सुरु करण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. मात्र अद्यापही काम समाधान कारक झाले नसल्याची खंत आजच्या जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत सदस्यांनी बोलून दाखवली. त्याला जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी देखील दुजोरा देत नाराजी व्यक्त केली.
महामार्गावरील एक मार्गिका सुरु कराल परंतू गणेशभक्त परतताना त्यांनी काय खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करायचा का, असा सवाल भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी करत भाजपाला घरचा आहेर दिला. गणेश चतुर्दशीला गणेशभक्त कोकणातून मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक असल्याने खड्डे लवकर भरुन तोही मार्ग सुस्थित करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिले. सण साजरा करताना सर्वांनी एकोप्याने आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन डॉ. म्हसे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, अतिरीक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या कालावधीत गावठाण विस्तारात बांधलेल्या घरांबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस काढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसांमुळे सण-उत्सवाच्या कालावधीत अशांतता निर्माण होऊ शकते. असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सदरचे प्रकरण तपासून पाहण्यात येईल.
डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड
सणाच्या कालावधीत जिल्ह्यातील शांतता बिघडवण्याचे काही समाज विघातक सरासवले आहेत. यासाठी ते समाज माध्यमांचा बखुबी वापर करत आहेत. त्यांना वेळीच रोखल नाहीतर, जिल्ह्यात मोठी घटना घडू शकते, असा विषय देखील मांडण्यात आला. सायबर सेलच्या माध्यमातून अशा पोस्टे, मेसेजवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील सुमारे 12 घटना टाळल्या गेल्या आहेत. यापुढे पोलीस प्रशासन दक्ष राहील.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक, रायगड