| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, इंदापूर ते वडपाले या टप्प्यातील अनेक भागात रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांतील खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. तसेच वाहनेही नादुरुस्त होत असल्याने या रस्त्याचा फटका प्रवासी चालकांना बसत आहे. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आला असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत. माणगाव व इंदापूर बायपासही अपूर्ण आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी महामार्गावरून गावी कोकणात जाणार्या गणेशभक्तांना खड्ड्यांच्या विघ्नातून प्रवास करावा लागणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला. गणेशभक्तांना यावर्षी प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांनी सिंगल लेन पूर्ण करण्याची हमी दिली होती. त्यामुळे गणेशभक्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, इंदापूर ते वडपालेदरम्यान महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे कोकणात जाणार्या गणेशभक्तांना या शहरात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवासाला बायपासचे विघ्न कायमच रहाणार आहे. माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या 10 कि.मी.पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्याने या गणेशभक्तांना यांचा फटका बसणार आहे. माणगाव शहराला चारही बाजूंनी रस्ते मिळत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. माणगाव शहराला बायपास रस्ता होत असून, तोही रस्ता भविष्यात अपुरा पडणार आहे. माणगाव शहराच्या पूर्वेकडून कळमजे फाटा ते ढालघर गावाच्या पुढे असा 6 कि.मी. बायपास होणार आहे. त्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
माणगाव हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून भविष्यात नवी ओळख निर्माण करेल यासाठी माणगाव शहराच्या पश्चिमेकडून रिंग रोड बनवून रस्ता काढता येईल जेणे करून माणगाव बायपासवरही वाहतूक कोंडी होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड, दापोली व रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार, हरिहरेश्वर व परिसरातील पर्यटन क्षेत्रावर सहज पर्यटकांना जाता येईल.
अस्लम राऊत, शेकाप नेते, मोर्बा