। उरण । वार्ताहर ।
चाणजे हद्दीतील अतिक्रमण तसेच समुद्राचे पाणी व खारफुटीचे अतिक्रमण झालेल्या शेतजमिनीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा संबंधित जमीन संपादित करावी. साकव वर हाईट गेज पूर्ववत करणे, साकवची प्लॅप गेट कायम स्वरूपी ठेवणे. शेतकर्यांवर अन्याय करणार्या संबंधित प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करणे आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून दि.7 डिसेंबर पासून सिडको कार्यालय, द्रोणागिरी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.
या मागणीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव महसूल विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक कांदळवन कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण, भूमी व भूसंपादन अधिकारी सिडको नवी मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा बंदर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणी अविनाश म्हात्रे यांनी पत्रव्यवहार केला असून सदर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाही तर मंगळवारी (दि. 7) पासून बाधित शेतकर्यांद्वारे सिडको कार्यालय द्रोणागिरी येथे मरेपर्यंत उपोषण करण्यात येईल. व होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा चाणजे शेतकरी संघर्ष समितीने प्रशासनाला दिला आहे.