वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात; तरुणीचा दुदैवी मृत्यू

19 जण जखमी

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ माथेरान घाटात जूम्मापट्टी पासून किरवली पट्ट्यात असलेल्या आसलवाडी आदिवासी वाडी येथून नवरी नवऱ्यासह निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातात 19 जण जखमी झाले आहेत, तर एक 18 वर्षीय तरुणी मृत्युमुखी पडली आहे.

नेरळ टपालवाडी येथील आरती रमेश भला यांचा विवाह आसलवाडी नाण्याचा माळ येथील समिर किसन सांबरी या तरुणाबरोबर सोमवारी (दि.15) झाला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.16) आरती हिला आपल्या माहेरी नेण्यासाठी नेरळ टपालवाडी येथून वऱ्हाडी मंडळी आसलवाडी येथे आली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समिर सांबरी यांच्यासह नाण्याचा माळ आसलवाडी येथून टपालवाडीकडे जाण्यास निघाले. साधारण 35 जणांच्या वऱ्हाडी मंडळी यांना घेवून नेरळ आनंदवाडीकडे पीकअप टेम्पो (एमएच-46-ई-0453) निघाला होता. आसलवाडी गाव सोडून पुढे बेकरेवाडीकडे जाऊ लागला असता त्या पीकअप गाडी मधील जास्त संख्येने प्रवास करणारे प्रवासी असल्यामुळे तेथील चढावावर गाडीचा मोशन तुटला आणि गाडीने उजव्या बाजूला पलटी मारली. तेथील तीव्र उतारामुळे 35 प्रवाशांनी भरलेला टेम्पो आणखी दोन पलटी मारून शेताच्या बांधावर जाऊन अडकला.


दरम्यान, टेम्पो मातीच्या रस्त्यावरून पलटी मारत असताना त्या टेम्पोमध्ये असलेली वीणा मारुती निरगुडा (18) या तरुणीने टेम्पोमधून खाली उडी घेतली. मात्र त्या तरुणीचे दुर्दैव असे की, वऱ्हाडी मंडळीने भरलेला टेम्पो तिच्याच अंगावर जावून आदळला आणि त्यातच तीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आसलवाडी, बेकरेवाडी आणि नाण्याचा माळ येथील आदिवासी लोकांनी जखमींना वाचविण्यासाठी धाव घेतली. साधारण संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जखमींना आसलवाडी येथून जूम्मापट्टी मार्गे माथेरान नेरळ घाट रस्त्याने रायगड हॉस्पिटल अँड डॉ. एन. वाय. तासगावकर मेडिकल रिसर्च सेंटर, डिकसळ येथे नेण्यात आले. रात्री नऊपर्यंत रायगड हॉस्पिटल मध्ये टेम्पो अपघातातील 19 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन जखमींना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर अन्य 16 जण यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करून उपचार सुरू केले होते. त्याचवेळी सहा जणांना किरकोळ मार लागल्याने प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले होते.

रुग्णालयात दाखल असलेले जखमी
तुळशी भल्ला (70), जीवन वाघ (10), अर्चना भगवान भंगारा (06), तुषार निरगुडा (10), सोनाली वाघ (13), दारकी पोकळ (70), गायत्री भला (15), राणी मढोळे (27), चांगुना निरगुडा (35), जानकी पारधी (75), भीमा आवटे (70), नंदिनी दरोडा (22), सखु पारधी (30), पुष्पा पारधी (28), जयवंत मारुती उघडा (32), अश्विनी निरगुडे (21), कल्पना दोरे (28), वैशाली वाघ (30).

मोठा अनर्थ टळला
त्या बांधाच्या 30 मीटर अंतरावर टेम्पो गेला असता आणि तेथे टेम्पोने पलटी घेतली असती तर मात्र मोठा अनर्थ घडला असता. कारण तेथून हा टेम्पो किमान 500 फूट खोल दरीत आसल पाडा गावाच्या हद्दीत खाली आला असता आणि मोठी दुर्घटना झाली असती. मात्र दैव बलवत्तर म्हणून वऱ्हाडी मंडळींचा अपघात थोडक्यावर निभवला.

नवीन दाम्पत्य जखमी
आरती सांबरी आणि समिर सांबरी हे नव दाम्पत्य देखील त्या अपघातग्रस्त टेम्पो सोबत होते. टेम्पो पलटी झाल्याने झालेल्या अपघातात नवरी मुलगी आरती ही किरकोळ जखमी झाली असून नवरा मुलगा समिर यांच्या पायाचे हाड मोडले आहे.

वीणा निरगुडा वर टपाल वाडी येथे अंत्यसंस्कार
टेम्पो पलटी होत असताना गाडीमधून उडी मारणारी वीणा मारुती निरगुडा हीचा या अपघातात मृत्यू झाला होता. वीणा हीचा मृत्यू झाल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यात आले आणि नंतर रात्री टपाल वाडी येथे दफन करून संस्कार करण्यात आले.

Exit mobile version