| कुसुंबळे | जिविता पाटील |
पोयनाडमधील कुसुंबळे-कातळपाडा मार्गावर मंगळवारी (दि.25) चारचाकी व दुचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात मद्यधुंद टेम्पोचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9:30 वाजता एमएच-06-बीएच-6320 हा मच्छीने भरलेला टेम्पो भरधाव वेगाने नागोठण्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एमच-06-बीझेड-9726 या दुचाकीवरुन आरती भारत पाटील (वय 40) व हिराचंद्र दत्तू म्हात्रे (वय 50) हे दोघे जेएसडब्ल्यू येथे नेहमीप्रमाणे कामाला जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन चालक दिनेश परदेशी याचा गाडीवरील ताबा सुटला. तसेच त्याने विरुद्ध बाजूला येत दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस ठाण्याचे एपीआय बेलदार, एएसआय सर्के, लवटे, ट्रॅफिक हवालदार पवार यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

यावेळी घटनास्थळी पाहिले असता चारचाकी वाहनामध्ये ड्रायव्हरच्या सिटजवळ अर्धवट प्यायलेली दारूची बॉटल दिसून आली. त्यामुळे चालकाने मद्यप्राशन करुन गाडी चालविल्यामुळेच हा भीषण अपघात झाला असून दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे, असे मत घटनास्थळी हजर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती जिविता पाटील यांनी व्यक्त केले आहे.
तसेच मृत्यू झालेल्या व्यक्ती या कुटुंबातील कमावत्या व्यक्ती असल्याने त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडले आहे. त्यामुळे संबंधितांनी योग्य तपास करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि असे न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, अशी मागणी स्थानिकांनकडून होत आहे. या प्रकाराबद्दल स्थानिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.