। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये भर दुपारी दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पगार देण्यावरून नामकींत इडली शॉपच्या मालकाने हा वार केल्याची माहिती अलिबाग पोलीसांनी दिली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शहरातील कामतआळी येथे मंगळवारी (दि.22) घडली. तसेच, हल्ल्यातील दोन्ही जखमींवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश कारिया असे या हल्लेखोर मालकाचे नाव आहे. शहरात त्यांचे नादब्रहम नावाचे इडली विक्रीचे दुकान आहे. या दुकानात सायली मार्कील व अक्षता दळवी गेल्या वर्षभरापासून कामाला आहेत. त्यांनी काम सोडून देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी कारिया यांना भेटायला आले. त्यांनी पगाराची मागणी केली. कारीया यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये पगार देईन सांगत ते देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून शाब्दिक वाद झाला. कारीया यांनी आपल्याकडे असलेल्या चाकूने हल्ला केला. अक्षता दळवी व सायलीचे नातेवाईक रविंद्र मार्कील यांच्या अंगावर, मानेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यातील दोन्ही जखमींवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.