स्त्री-पुरुष वेतन समानतेच्या दिशेने मोठे पाऊल
| मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी महिला क्रिकेटर्सना पुरुषांसारखे एकसमान मॅच फिस देण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंबंधीचे एक ट्विट केले. महिला क्रिकेट खेळाडूंना यापुढे पुरुषांसारखेच वेतन दिले जाईल, असे ते म्हणाले.
भारत क्रिकेटमध्ये लैंगिक समानता लागू करण्याच्या दिशेने एका नव्या युगात प्रवेश करत आहे. यापुढे पुरुष व महिला क्रिकेटर्सना एकसमान मॅच शुल्क अदा केले जाईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय पुरुष संघाच्या खेळाडूंना प्रति टेस्ट मॅच 15 लाख, तर एकदिवसीय सामन्यासाठी 6 व टी-20 सामन्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मॅच फीस मिळते. बोर्डाच्या नव्या निर्णयानंतर कंत्राटी महिला खेळाडूंनाही यापुढे एवढेच मॅच शुल्क मिळेल. यामुळे महिला खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळेल.
बीसीसीआय पुरुष खेळाडूंसारखे महिला खेळाडूंसोबतही वार्षिक करार करते. पण दोघांच्या मॅच फीसहून कराराच्या शुल्कात मोठे अंतर आहे. भारतीय पुरुष क्रिकेटर्सना ‘ए+’ कॅटेगरी अंतर्गत वार्षिक 7 कोटी, ‘ए’ कॅटेगरीसाठी वार्षिक 5 व ग्रेड ‘बी’ अंतर्गत वार्षिक 3 व ग्रेड ‘सी’ साठी वार्षिक 1 कोटी रक्कम मिळते. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या कराराची रक्कम फार कमी आहे.
महिला क्रिकेटर्सची स्थिती
पुरुष क्रिकेटर्ससाठी कराराच्या 4 कॅटेगरी आहेत. पण महिला खेळाडूंसाठी त्या अवघ्या 3 आहेत. ‘ए’ कॅटेगरीच्या खेळाडूंना वारषिक 50 लाख, तर ‘बी’ कॅटेगरीच्या खेळाडूंना वार्षिक 30 लाख रुपये फिस दिली जाते. याऊलट ‘सी’ कॅटेगरीतील करार झालेल्या खेळाडूना वार्षिक 10 लाख रुपये मिळतात.