पुरुषी मानसिकतेवर राहुल गांधींचे तिखट प्रहार
| पुणे | प्रतिनिधी |
“गेल्या अनेक वर्षांपासून मला शिव्या दिल्या जात आहेत; पण मी सुधरणार नाही!” या राहुल गांधींच्या थेट आणि आक्रमक वक्तव्याने पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात राजकीय वातावरण चांगलेच तापले. हजारो विद्यार्थिनींच्या उपस्थितीत रविवारी राहुल गांधी यांनी महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, असमान वेतन आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुलींनी व्यक्त केलेला आक्रोश ‘सांस्कृतिक धक्का’ वाटतो; पण मुलांनी केलेल्या त्याच प्रकारच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जाते, असा सवाल करत राहुल गांधी यांनी सरकारच्या कथित पुरुषप्रधान आणि मनुवादी मानसिकतेवर थेट निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या मानसिकतेवर कडाडून टीका केली. मुलींनी शिवीगाळ केली की संस्कृतीचा प्रश्न उपस्थित केला जातो; मात्र मुलांनी तशी भाषा वापरली तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हा दुहेरी मापदंड असल्याचे त्यांनी म्हटले. मुलींवर नियंत्रण हवे, त्यांना एका चौकटीत बंदिस्त ठेवायचे आणि मुलांना मात्र पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे अशी मानसिकता आम्हाला मान्य नाही, असा थेट हल्ला त्यांनी केला.
कार्यक्रमात राहुल गांधी यांनी महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारी, महिलांना रोजगारासाठी घ्यावी लागणारी संमती आणि वेतनातील असमानता यासह अनेक मुद्दे मांडले. महिलांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बलात्कार आणि महिलांबाबत काही राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी अशा विचारांना घाणेरडी मानसिकता संबोधले. महिलांनी गप्प बसावे, त्यांनी मर्यादेतच राहावे आणि पुरुषांना मात्र अमर्याद स्वातंत्र्य असावे, हा विचारच बदलला पाहिजे, असे ते म्हणाले. आम्हाला असा हिंदुस्थान नको, जिथे मुलींना पिंजऱ्यात कोंडले जाते आणि मुलांना काहीही करण्याची मुभा असते. आम्हाला आदर हवा आहे आणि तो प्रत्येकासाठी समान हवा आहे, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. या आक्रमक भूमिकेमुळे ‘छात्रो की गुंज’चा कार्यक्रम केवळ विद्यार्थी संवाद न राहता केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि महिलांच्या सामाजिक स्थानावरून काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाचे नवे व्यासपीठ ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.






