बोर्ली ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशय; मोजमाप पुस्तिकाच गायब, चौकशीची मागणी
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
बोर्ली ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चंद्रकांत चोगले यांच्या घरापासून सुर्वे घरापर्यंतच्या एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या आर्थिक वर्षांत दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून निधी खर्च झाल्याची नोंद समोर आल्याने शासकीय निधीच्या वापराबाबत संशय बळावला आहे. त्यातच माहिती अधिकारातून कागदपत्रे मागितल्यानंतर या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कणगी आणि राजेश तरे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरुड यांच्याकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित रस्त्याचे काम दोन वेगवेगळ्या आर्थिक वर्षांत दोन वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून झाल्याची नोंद कागदपत्रांमध्ये दिसून येते. त्यामुळे एकाच रस्त्याचे काम दोनदा दाखवून शासकीय निधी खर्च करण्यात आला का? असा थेट सवाल उपस्थित झाला आहे. सार्वजनिक बांधकामाच्या प्रत्यक्ष कामाची मोजणी, कामाचे प्रमाण आणि त्यानुसार देयक निश्चित करण्यासाठी मोजमाप पुस्तिका हा महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज असतो. मात्र, माहिती अधिकारातून संबंधित कागदपत्रांची मागणी केल्यानंतर या कामाची मोजमाप पुस्तिका उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम किती झाले, त्याचे मोजमाप कसे झाले आणि त्यानुसार देयके कशी अदा करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या रस्त्यासाठी खर्च झालेल्या निधीचा संबंध गणेश आळी येथील रस्त्याच्या निधीशी असल्याचाही संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या शासकीय अहवालात गणेश आळीच्या रस्त्यासाठी असलेला निधी अन्यत्र वळविल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर रस्ता एकच असेल तर त्यासाठी दोनदा निधी का खर्च झाला? दोनदा काम दाखवले असेल, तर त्याची मोजमाप पुस्तिका कुठे आहे? प्रत्यक्ष काम आणि कागदोपत्री कामात तफावत आहे का? आणि जनतेच्या पैशाचा नेमका वापर कुठे झाला?
ही कोणाविरुद्धची वैयक्तिक मोहीम नाही. हा जनतेच्या पैशांचा आणि शासकीय निधीच्या पारदर्शक वापराचा प्रश्न आहे. एकाच कामासाठी दोनदा निधी खर्च झाला असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जनतेच्या करातून जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब मिळालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका प्रतिक कणगी आणि राजेश तरे यांनी मांडली. आता पंचायत समिती मुरुड प्रशासन या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते, याकडे बोर्ली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. चौकशी झाली तर एकाच रस्त्याच्या नावाखाली झालेल्या निधीच्या वापराचे खरे चित्र समोर येण्याची शक्यता आहे.






